राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान! – राष्ट्रपती

महाराष्ट्रातील १ परिचारिका, १ एएनएम ला राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली- राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि…

महाराष्ट्रातील १ परिचारिका, १ एएनएम ला राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली- राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि १ एएनएम (परिचारिका सहायक) यांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांचा जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी २० परिचारिका, १२ परिचारिका सहायक (एएनएम), २ महिला आरोग्य अभ्यागत असे आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या एकूण ३५ मान्यवरांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य आणि कुटूंब कल्याण सचिव प्रीती सुदान उपस्थित होते.

राष्ट्रपती म्हणाले, पुरस्कार प्राप्त सर्व स्त्री-पुरुष परिचारीका, आरोग्य सेविका या विविध राज्यातील असून यामधूनही भारताच्या वैविध्याचे दर्शन घडते. आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्वपूर्ण घटक या परिचारिका, आरोग्य सेविका आहेत. दुर्गम भागात आजारी रूग्णांची सेवा करणे हे राष्ट्रनिर्मितीचे कार्य असून यात मोठी भूमिका परिचारिका, आरोग्य सेविका निभावतात.

अधिक दर्जेदार आरोग्य सेवा प्राप्त व्हाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. मागील काही वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक संस्था निर्माण होत आहेत, यामधून परिचारिका आणि आरोग्य सेविका शिक्षण घेत आहेत. देशातील आरोग्य सेवा अधिक चांगल्या होण्यात याचा मोठा लाभ होत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील ३५ परिचारक, परिचारिका, आरोग्य सेविका (एएनएम), महिला आरोग्य अभ्यागत यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘राष्ट्रीय नाइटिंगेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि १ परिचारिका सहायक (एएनएम) यांचा समावेश आहे. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतो.

मुंबईतील परळमधील बी.जे. वाडिया बाल रूग्णालयातील मेट्रन (मुख्य परिचारीका) श्रीमती आशा नरेंद्र महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी तर, जळगाव जिल्ह्यातील कसोडा तालुक्याच्या एर्नाडोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारीका सहायक (एएनएम) शोभा माधव पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. (सौजन्य
‘महान्यूज’)

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page