नागपूरची देशाच्या ‘लॉजिस्टिक हब’कडे वाटचाल – मुख्यमंत्री

नागपूर:- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची सुरुवात बुटीबोरीतून होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कामगार निर्माण करणारी कौशल्ययुक्त यंत्रणा उभी राहत आहे. कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जाणार…

नागपूर:- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची सुरुवात बुटीबोरीतून होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कामगार निर्माण करणारी कौशल्ययुक्त यंत्रणा उभी राहत आहे. कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जाणार आहेत. कामगारांच्या प्रशिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालये उभी राहत आहेत. रेल्वेचा कार्गो प्रकल्प देखील या ठिकाणी सुरू होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर हे संपूर्ण देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

बुटीबोरी येथील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बुटीबोरी टी पॉईंटवरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल, ईएसआयसीचे दोनशे बेडचे अद्ययावत रुग्णालय व बुटीबोरी बसस्थानकाचे ई -भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्यासपीठावर केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार, राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, हिंगणा-बुटीबोरीचे आमदार समीर मेघे, आमदार सुधाकर कोहळे ,आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महाराष्ट्रासह देशभर विकास कामाचा झंझावात सुरू केला आहे. बुटीबोरी येथील उड्डाण पुलासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून मागणी होत होती. ईएसआयसी रुग्णालयाची आवश्यकता या ठिकाणी आहेच. बस स्थानकाची मागणी जुनीच होती. या सर्व मागण्यांचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद आहे. ईएसआयसी रुग्णालयाच्या मागणीबद्दल केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. नागपूर शहराच्या चौफेर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत निधी दिला जात आहे. ते जलसंपदा मंत्री देखील असल्यामुळे सिंचन समृद्धीसाठी देखील त्यांची मदत होत आहे. नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाच्या संस्था उभ्या होत आहेत. रेल्वेचा कार्गो प्रकल्प उभा राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून हिंगणा-बुटीबोरी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगारांची घरे नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार उभे केली जातील. कामगारांची आरोग्य, प्रशिक्षण, शिक्षण आदी व्यवस्था बळकट करणे सुरू आहे. अनेक पायाभूत सुविधांचे मुख्य प्रकल्प नागपूर मध्ये उभे राहत आहे. कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. त्यामुळे नागपूर लवकरच केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनून पुढे येईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, यासाठी हे सरकार काम करीत असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

श्री. गडकरी यांनी बुटीबोरी परिसरात १८० कोटी रुपयांच्या २०० बेडच्या रुग्णालयासाठी व रघुजीनगर परिसरातील कामगारांचे रुग्णालय आता ईएसआयसी मार्फत सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांचे आभार मानले. या परिसरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

रेमंड कंपनीतर्फे या परिसरात दहा एकरावर अत्याधुनिक शाळा उभारली जाणार असून या ठिकाणी कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनादेखील त्यांनी केली . नागपूर-भंडारा, नागपूर-वर्धा व अन्य प्रमुख मार्गावर ब्रॉड गेज मेट्रो सुरू करणार असल्याचे सांगताना त्यांनी या ब्रॉड गेज रेल्वे लागणाऱ्या डब्यांची निर्मितीचा कारखानाही नागपूरमध्ये उभारला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

बुटीबोरी व हिंगणा यांना नगरपालिकेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. नागपूर हे देशातील एक आदर्श शहर म्हणून पुढे आले पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी यावेळी संबोधित करताना महाराष्ट्रातील ईएसआयसी रुग्णालयाच्या व्यवस्थेला बळकट करण्याची मागणी केली. या कार्यक्रमाला पालकमंत्री बावनकुळे यांनी देखील संबोधित केले. या परिसरात उभ्या राहणाऱ्या एमआयडीसीतील उद्योगसमूहांना छत्तीसगडपेक्षा दहा पैसे कमी दराने वीजपुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आमदार समीर मेघे यांनीदेखील यावेळी संबोधित केले. हिंगणा मतदारसंघामध्ये बावीसशे कोटींची विकासकामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सुरू असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. खासदार कृपाल तुमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उड्डाणपुलाची मागणी मान्य केल्याबद्दल उभय नेत्यांचे आभार मानले. (‘महान्यूज’)

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page