प्रथम स्वातंत्र्यसैनिकांना व शूर सैनिकांना साष्टांग दंडवत!
स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि नंतर ७५ वषेॅ शूर जवानांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वतंत्र देशाच्या यज्ञाचा लाभ आम्ही घेत आहोत. त्यांच्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण त्यांच्यामुळे असतो, ही भावना सदैव ठेवली पाहिजे. त्यांचा आदर्श आमच्यासमोर नियमित असल्यावर आमच्याकडून भारत देशाच्या जबाबदार नागरिकाची कर्तव्य संपन्न होतील.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणे असो वा देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सदैव सज्ज राहून प्राणांची बाजी लावणारे आजचे शूर सैनिक असोत; त्यांच्या त्यागवृत्तीने आमचा देश सुरक्षित राहिला आणि राहतो. त्यामुळे आजच्या शूर सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल आमच्या मनात मानाचे स्थान असायला हवे. सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची ही भूमिका आम्ही निभावून नेऊ; पण राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मात्र काटेकोरपणे ह्याची जाणीव ठेवायलाच पाहिजे. कारण देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांच्या कुटुंबियांचा योग्य तो सन्मान ठेवताना राज्यकर्त्यांकडून-प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या अनेक घटना देशात घडत आहेत. त्यामुळे देशभक्त संवेदनशील नागरिकांच्या मनात चीड निर्माण होते.
देशाची सुरक्षा हा देशासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असतो. त्याला प्राधान्य देऊन जेव्हा सैनिक देशाचे रक्षण करीत असतो, तेव्हा तो आपले प्राण पणाला लावत असतो. दुष्मन सैन्यांची- दहशतवाद्यांची गोळी कधीही छातीत घुसू शकते किंवा त्यांचा बॉम्ब शरीरावर येऊन पडू शकतो. अशा परिस्थितीत सैनिक सीमेवर लढाई लढण्यास मनाने-शरीराने समर्थ असतो; परंतु त्यांचे कुटुंबिय नेहमी कुठल्या तणावाखाली असतात; ह्याचा आपण विचार करतो का? त्या सैनिकाची आई, वडील, पत्नी, मुलं, भाऊ, बहिण ह्या सर्व आप्तांना नेमकं काय वाटत असेल? आपल्या देशासाठी हे सर्व सैनिकांचे रक्ताचे नातेवाईक सहन करीत असतात. आपल्या मुलाचे, आपल्या पतीचे, आपल्या बापाचे देशाचे संरक्षण करताना प्राण जाऊ शकतात; हे वास्तव ते सहन करीत असतात. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या घरी जाऊन याचा अनुभव निश्चित घ्यावा. अशा सैनिकांच्या कुटुंबियांना मात्र प्रशासनातील व्यवस्था बहुतांश वेळा जुमानत नाही; हे चित्र संतापजनक आहे.
मग व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहतं. देशासाठी प्राणाचे योगदान करण्यास सदैव सज्ज असणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या जीवनात जर ‘स्वतंत्र भारतातील व्यवस्था’ सहकार्य करीत नसेल तर सर्वसामान्य जनता, शेतकरी, आदिवासी, गरीब, अशिक्षित, असंघटीत जनतेला कोणाचा आधार असणार आहे? हा प्रश्न ७५ वर्षानंतरही पडतोय.
देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली; त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण दुसरीकडे सर्वसामान्यांच्या हक्कांना नाकारणारी ‘व्यवस्था’ उभी राहिल्याचे चित्र स्पष्टपणा दिसत आहे. अगदी गावपातळीपासून त्याची सुरुवात होते. फक्त आणि फक्त स्वत:चा स्वार्थ साधायचा हाच एकमेव उद्देश ठेवून वावरणाऱ्या मंडळींची जेव्हा ही ‘व्यवस्था’ उभी राहते, तेव्हा देशामध्ये लोकशाहीला मारक असणारी तत्वे उदयाला येतात. त्यांच्याशी सर्वसामान्य लढाई करू शकत नाही. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे सैनिक आणि त्याच देशात ‘समान विघातक व्यवस्था’ पाहिली की गोंधळ उडतो.
पण एक निश्चित आहे; देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताच्या थेंबातूनच देश उभा राहतो आणि विघातक व्यवस्थेचा नायनाट होतो. परंतु ह्या देशावर प्राणांपेक्षा अधिक प्रेम करणाऱ्यांना ह्या देशातील व्यवस्था खऱ्याखुऱ्या स्वांतत्र्याला साजेशी असणारी हवी आहे. ती `स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था’ जेव्हा अंमलात येईल तेव्हाच पुन्हा एकदा देशावर प्रेम करणाऱ्या-जबाबदारीचे भान ठेवणाऱ्या भारतीयांची फौज उभी राहील; असे आम्हाला वाटते.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सर्व श्रद्धावान भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
-नरेंद्र हडकर

Leave a Reply