संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास…

 

 

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.

 

आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास करायला मिळायचा. त्यातही आमची शाखा सायन्स ( विज्ञान) असल्याने विज्ञानातील नवनवीन गोष्टी समजायला मदत होत असे. त्यामध्ये मला आजही आठवणारा एक घटक म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत. हा उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केला. पण त्यातील एक मुद्दा आज ०३ जूनच्या निमित्ताने आठवतोय. तो म्हणजे struggle फॉर existance. म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष. हा गुण चार्ल्स डार्विन यांनी मानवी वृत्तीच्या अभ्यासातून लिहिला. माणसाला स्वतःला सिद्ध करायचे असेल तर त्यांना संघर्ष हा करावाच लागणार आहे. कारण याच संघर्षातून त्याला आयुष्यात श्रेष्ठत्व मिळत असते. हेच श्रेष्ठत्व संघर्षातून मिळालेले असल्याने कालातीत टिकत असते. हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे आज ०३ जून २०२१.

काही वर्षांपूर्वी यादिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातील सर्वसामान्य लोकांचे नेते आणि ग्रामीण तसेच शहरी भागाची नस ओळखणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने संपूर्ण भारत हळहळला. त्यांचा आज स्मृतिदिन.

एका सर्वसामान्य कुटुंबात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जन्म झाला. डार्विनच्या मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतामधील वरील मुद्दा हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे संघर्षमय आयुष्य पाहिले की, त्यांच्या याच संघर्षमय आयुष्यासाठी चपखल बसतो. ज्याप्रमाणे प्रत्येक एका राष्ट्रपुरुषांचे एक वैशिष्ट्य असते किंवा एखाद्या समान विचारभोवती त्यांचे आयुष्य फिरत असते. त्यानुसार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे आयुष्य हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता, भटके, विमुक्त आणि ओबीसी यांच्या हितासाठी सहज, मध्यम वा टोकाचा संघर्ष करण्यात गेले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्या याच संघर्षातून त्यांचे नेतृत्व बहरत गेले. लोकप्रिय बनत गेले. आणि त्यांचे हेच लोकप्रियत्व एक दिवस त्यांना लोकनेते या पदापर्यंत घेऊन गेले. त्यांच्या या कार्याची दखल तत्कालीन सर्वपक्षीय राष्ट्रीय नेत्यांनी घेतली. म्हणूनच दिनांक १२ डिसेंबर २०१० रोजी त्यांच्या एकसष्टीनिमित्त पुण्यात एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा भारताचे माजी उपप्रधानमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित होते. त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा संघर्ष, लोकानुययी तळमळ, सर्वसामान्य लोकांचे संघटन, त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची त्यांची तयारी, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ करणारी “माधवं” ही एकीकरणाची चळवळ, भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहचविण्यासाठी केलेले कष्ट जवळून पाहिले होते. म्हणूनच या समारंभात त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कार्याचा गौरव करताना असे म्हटले की, गोपिनाथ मुंडे हे नेते नसून लोकांच्या मनात असणारे लोकनेते आहेत. एका राष्ट्रीय आणि देशाच्या महत्वाच्या पदावर कार्य केलेल्या व्यक्तीने दिलेली ही उपमा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कर्तृत्वाला साजेशी होती.

आयुष्यभर संघर्षातून यशस्वी राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या लोकनेत्याचा आज स्मृतिदिन. या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या संघर्षाला आणि त्या संघर्षातून निर्माण झालेल्या त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला मनःपूर्वक अभिवादन!

अशा या लोकनेत्याचा जन्म दिनांक १२ डिसेंबर १९४९ रोजी पांडुरंग आणि लिंबाबाई यांच्या कुटुंबात नाथ्रा ता. परळी जि. बीड या गावी झाला. घरातील परिस्थिती अगदीच बेताची आणि लहानपणीच वडिलांचे अकाली निधन झाले; पण त्यांचे मोठे भाऊ पंडितअण्णा यांनी मोठ्या हिमतीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी त्यांनी आपले शिक्षण देखील सोडले. त्यांच्या लहानपणीच एक प्रसंग असा की, त्यांचे वडील स्वर्गीय पांडुरंग मुंडे हे वारकरी होते. ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जायचे. जवळच असणाऱ्या भगवानबाबांच्या गडावर कीर्तनाला जायचे. त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर लहानपणापासूनच माणुसकी जपण्याचा संस्कार झाला होता असे म्हणण्यास वाव आहे. एवढेच नव्हे तर स्वतः मुंडे साहेब हे वयाच्या १४ व्या वर्षांपासून वारीला गेले होते. पुढील सात वर्षे त्यांनी न चुकता पंढरपूरची वारी केली. मग मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठीची रस्त्यावरील वारी त्यांनी आयुष्य भर जपली. रस्त्यावरून चालत जाऊन सर्वसामान्य लोकांमध्ये पांडुरंग पाहिला. आणि त्यांच्या हितासाठी जनतेची वारी केली. त्यानंतर मात्र लोकांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर रस्त्यावरच उतरून संघर्ष केला.

गोदा परिक्रमा, शेतकरी पायी दिंडी, बांधावरील भेटी, सगळ्यात महत्वाची म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रा, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी केलेली यात्रा अशा विविध माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे सतत कार्य करत राहिले. त्यामुळेच लोकांमध्ये विशेष करून ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत होती. हीच लोकप्रियता त्यांना नवी दिशा देत होती.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानन्द तिर्थ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आणि मला वाटते हा महाविद्यालयीन काळ त्यांच्या उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. कारण याच महाविद्यालयातून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांना वयाच्या पंचवीशीतच राजकारणात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली. बीड जिल्हा परिषदेच्या उजनी गटातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीही वळून पाहिले नाही. स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य – सलग दोन वेळा आमदार – उपमुख्यमंत्री – गृहमंत्री – ऊर्जामंत्री – परत आमदार – खासदार – केंद्रीय ग्रामविकास मंत्री या सोबत त्यांच्या पक्षांतर्गत ही खूप मोठ्या प्रमाणात विविध पदावर त्यांनी कामे केली. हे काम करत असताना मात्र त्यांनी कधीही आपले पाय जमीनीवरून हवेत जाऊ दिले नाहीत. आकाशाला देखील त्यांचे हात स्पर्श करू शकतील एवढी मोठी वैचारिक उंची त्यांची होती; पण त्यांनी या उंचीच्या हव्यासापोटी कधीही सर्वसामान्य लोकांशी असणारी नाळ तुटू दिली नाही. म्हणूनच ते लोकनेते बनू शकले. आपल्याकडे असणा-या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे ते पक्षाचा चेहरा बनत गेले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी आपल्या अथक परिश्रमातून तो ठराविक वर्ग आणि क्षेत्रापुरता मर्यादित असणारा त्यांचा पक्ष साहेबांनी सर्वांगीण बनवला. यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झंझावात निर्माण केला. आपले व आपल्या भल्यासाठीचे प्रश्न हा माणूस सोडवतोय, आपल्याला जाणवणाऱ्या प्रश्नांची जाण या व्यक्तीला दिसत आहे किंवा त्या प्रश्नांच्या मुळात जाण्याची धमक त्यांच्यात दिसून येते, म्हणून ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर विश्वास ठेवणारी एक पिढी निर्माण झाली. आणि याच पिढीने लोकांना आपलेसे करत भारतीय जनता पक्ष सर्वदूर पसरविला. विशेष म्हणजे  तत्कालीन अनेक नामवंत असणारे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे मान्य करतात. आज जरी पक्षाला गोड फळे लटकलेली दिसत असली तरी त्या झाडाच्या मुळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी उपसलेले कष्ट आहेत.

याच कष्टाच्या जोरावर ते १९८० साली आमदार झाले. तेंव्हापासून सलग चौतीस वर्षे ते राज्याच्या अथवा देशाच्या राजकारणात सक्रिय राहिले. मग ते सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष. मात्र त्यांच्या नावाची चर्चा सतत राजकारणात असायची. आणि हेच त्यांच्या कार्याचे मोठेपण होते. अनेकवेळा यशाने त्यांना साथ दिली. मात्र हा आयुष्याचा पट खेळत असताना अनेक वेळा त्यांच्यावर अपयशाचीही वेळ आली. मात्र आलेल्या अपयशाला अस्मान दाखवत ते सतत लोकांमध्ये मिसळून काम करत राहिले. ज्यावेळी १९८५ च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही ते डगमगले नाहीत. १९८६ मध्ये त्यांची निवड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर झाली आणि त्यांनी याच दरम्यान १९८७ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यावेळेच्या माहितीनुसार हाच मोर्चा त्यांच्या राजकिय करकीर्दीस वळण देणारा आणि त्यांची सर्वसामान्यांचे नेते ही ओळख दृढ करणारा ठरला. आणि सध्या सर्वत्र भाजप, ही प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामागे नक्कीच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची आणि त्यांच्या त्यावेळेच्या सहकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. हे त्यांचे समर्थक आणि विरोधक देखील मान्य करतील.

ज्याप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी आपल्या प्रवासात सतत शेतकरी, कष्टकरी, कामगार, ओबीसी, भटके, विमुक्त, सर्वसामान्य लोकांना मध्यवर्ती ठेवले. त्यामुळेच त्यांच्या मागे लोकांचा समुदाय उभा राहिला. साहेबांचे किमान पाच मिनिटांचे भाषण ऐकायला मिळावे यासाठी लाखो लोक कानात प्राण आणून प्रतीक्षा करत असत. मग साहेब कार्यक्रमाच्या अगोदर येऊ द्या किंवा उशिरा; पण साहेबांचे भाष्य ऐकल्याशिवाय जाणार नाही आणि मुंडे साहेबांनी देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्याना कधीही नाराज केले नाही.

ज्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन सरकारला विविध प्रश्नावर अक्षरशः सळो की पळो केले होते. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक सतत वाढता राहिला. त्यामुळेच जरी ते विरोधी पक्षात होते तरीही त्यांच्या नावाची जादू महाराष्ट्राच्या असंख्य मतदारांवर कायम राहिली. आपल्या विधानसभेच्या कार्यकाळात वाढती गुन्हेगारी, ढासळती शिक्षण व्यवस्था, घसरणारे शेतीमालाचे दर, बेसुमार बेरोजगारी यासह सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी रस्त्यावर प्रचंड मोठे आंदोलने केले. परिणामी महाराष्ट्र्रात त्यांचे सरकार आले. त्यांचा संघर्ष आणि कार्य करण्याची अफाट क्षमता पाहून उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जामंत्री, वित्तमंत्री यासारखी अत्यंत महत्वाच्या खात्याचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता आणि साहेबांची सर्व खात्यावरील पकड पाहता त्यांनी या खात्याची खऱ्या अर्थाने नवी ओळख महाराष्ट्राला करून दिली. ते जरी उपमुख्यमंत्री होते तरीही त्यांच्या कार्यभारात बाकीच्यानी कधीही हस्तक्षेप केला नाही वा साहेबांनी तशी कुणालाच संधी दिली नाही. त्यांच्या सगळ्या खात्यात त्यांच्या गृहमंत्री या पदाने नवी ओळख दिली. आज सर्वच क्षेत्रातील अनेक तज्ञ माणसे पोलिसांना सूट देण्याची वा त्यांना मुक्तपणे काम करू देण्याची गरज असल्याचे मत मांडत असतात. या मताचा आदर मान ठेऊन पोलिसांना खऱ्या अर्थाने मुभा जर कुणी दिली असेल तर ती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनीच. मुंबईतील बेफाम झालेल्या गुंडांच्या टोळ्यांना आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्री राहिलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पोलिसांना पूर्ण सूट दिली होती. परिणामी मुंबईतील टोळीयुद्धावर नियंत्रण राखता आले. थोडक्यात काय तर त्यांनी गुन्हेगारीकरणावर अंकुश लावला. विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. आपल्याकडील अनुभवाचा वापर करत त्यांनी सर्व खात्यांना मार्गदर्शन करत, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली. आपल्या अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रशासनावर त्यांनी एक वेगळी छाप सोडतानाच प्रशासनाला कार्यप्रवण केले. हे करत असताना प्रशासनातील सर्व बाबींचा विचार करून अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवताच प्रशासनाला गतिमान करण्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा हातखंडा होता.

त्यासोबतच त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे १९९५ ला सत्तेत आलेले सरकार हे अनेक अपक्षांच्या मदतीने आलेलं होते. त्या सर्व अपक्षांना एकत्र ठेवण्याचे वा त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्यावर सोपविण्यात आली होती. यातच त्यांच्या संघटनकौशल्याची जाणीव दिसून येते. ज्यावेळी १९९९ ला फक्त काही जणांच्या अतिमहत्वाकांशी स्वभावामुळे हातात आलेल्या सत्तेचा घास दूर झाला तो त्यापुढे पंधरा वर्षे. जर आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकली तर लक्षात येते की, साहेब सत्तेपेक्षा विरोधी पक्षात ते जास्त काळ होते.
मधल्या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली. मार्गदर्शन करणारे आणि पाठीवर सतत हात ठेवून लढण्याची प्रेरणा देणारे प्रमोद महाजन साहेब यांचे निधन झाले. हा आघात सहन होत असतानाच विरोधी पक्षात राहूनही जगाच्या कल्पनेपलीकडे मैत्री जपणारे विलासराव देशमुख साहेब यांचे निधन झाले. त्याच दरम्यान त्यांच्या घरातच सतेच्या लालसेपोटी वा इतर कारणासाठी फूट पडली. अनेक सहकारी मार्ग सोडून जाण्याचा विचार करू लागले. सर्वच स्तरांतून त्यांची जादू ओसरल्याची चर्चा हाऊ लागली. त्यांच्याकडे असणारी पदे त्यांच्या पक्षाने कमी करायला सुरुवात केली. ती इतकी की, त्यांना विधानसभेत पक्षाच्या वतीने बोलायची परवानगी सुद्धा नव्हती. हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना धक्का होता, अगदी तसाच त्यांच्या विराधात बसणाऱ्या विविध पक्षातील विविध नेत्यांनासुद्धा होता. तरीही ते अविचल राहिले. अगदी निर्विईकरपणे. त्यांचा त्यावेळेच्या संघर्ष पाहून अटलबिहारी वाजपेयी यांच्या ओळी आठवतात

क्या हार में क्या जीत में ,
किंचित नही भयभीत मैं ,
संघर्ष पथपर जो मिले ,
यह भी सही वह भी सही,
वरदान मांगुगा नही ,
हो कुछ पर हार मांनुगा नहीं…!!

ते अपयशाने खचले नाही. वा डगमगले नाहीत. उलट नव्या जोमाने आणि उत्साहाने त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांचे नेतृत्व अधिकच विकसित होत गेले. सातत्याने त्यांनी लोकांमध्ये मिळून – मिसळून काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेत लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांचा मतदारवर्ग पक्षाच्या भिंती तोडून तयार केला. सर्व समाजातील मतदारांनी त्यांना स्वीकारले. म्हणूनच ते लोकनेते बनत गेले.
भारताच्या कामगार इतिहासात जर ऊसतोड कामगारांना कुणी नवी ओळख निर्माण करून दिली असेल तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचेच नाव बिनदिक्कतपणे समोर येते. त्यांच्या याच भूमिकेमुळे महाराष्ट्राला वा देशाला ऊसतोड कामगारांच्या दुःखाची वा वेदनेची जाणीव झाली. या कामगारांना देखील हक्क मिळावेत, त्यांनाही कामाचा मोबदला चांगला मिळावा यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे सतत आग्रही राहिले नुसतेच आग्रही राहिले नाहीत, तर शासनात राहून वा विरोधात राहून त्यांनी या कामी सतत आवाज उठवला. म्हणून आजही ऊसतोड कामगार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आठवणीने गहिवरून जातात.

साहेबांनी मधल्या काळातील अपयश आपल्या सर्वांगीण भूमिकेच्या जोरावर पुसून काढले. आणि पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या विरोधकांनी साहेबांचे घर फोडून त्यांना अपशकुन केला. मग साहेबांनी त्यावर कडी करत विरोधकांच्या घरात महादेव जानकर साहेब यांच्यासारख्या आपल्या कडवट आणि निष्ठावंत मोह-याला विरोधकांच्याच घरात उतरवत विरोधकांना आयुष्यात पहिल्यांदाच घाम काढला. या काळात झालेल्या प्रत्येक वाराचे उत्तरे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रतिवाराने दिले. ज्यावेळी ते २००९ ला लोकसभेत निवडून आले. त्यावेळेची निवडणूक जर कुणाला आठवत असेल तर त्यांच्यासमोर विरोधकांनीं किती तरी मोठी ताकद लावली होती. मात्र साहेबांनी आपल्या आयुष्यात कमावलेल्या विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे फिरून पाहिले नाही. महाराष्ट्रातील अनेक चळवळीतील लोक आणि अनेक मित्रपक्षांना एकत्र करत सरकारविरोधी वातावरण निर्माण केले. परिणामी केंद्रात सरकार आले. त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्रामविकास मंत्रालय देण्यात आले.

यादरम्यान त्यांना राष्ट्रेनेतेपद खुणावत होते. पण याठिकाणी देखील त्यांनी आपल्या पक्षाच्या धोरणांना महत्व देत लोकसभेत अनेक विषयांवर चर्च घडवून आणली. त्यातील एक महत्वाचं मुद्दा म्हणजे ओबीसी जनगणना. भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसींची जनागणा व्हावी या मताचा आग्रह धरण्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब सर्वात पुढे होते. त्यांनी लोकसभेत भारतातील प्राण्याची जनगणना होते. मग ओबीसींची का नाही? असा प्रश्न करताच या प्रश्नाने भारत हलला आणि ओबीसी जनगणना व्हावी या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मागणीला संसदेत काही मोजकेच खासदार वगळता जवळपास सर्वच खासदारानी पाठिंबा देत ओबीसी जनगणना का महत्वाची आहे हे अधोरेखित केले. यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब फक्त मागणी करुन थांबली नाहींत तर त्यासाठी त्यांनी भारतातील सर्वच ओबीसी नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे मंडल आयोगानंतर पहिल्यांदाच ओबीसी जनगणना चर्चेत आली.

अशाप्रकारे आपल्यावर आलेल्या अनंत अडचणींवर मात करत त्यांच्या कर्तृत्वाचा सूर्य भारताच्या राजकारणात तळपत असताना ग्रामविकास मंत्रालय मिळाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहुन येत असतानाच काळाने घात केला, त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अखंड भारताच्या इतिहासात भटके – विमुक्त – ओबीसी – कामगार – सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा नेता काळाने हिरावून नेला.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे जगाच्या पाठीवर असे एकमेव नेते असावेत त्यांच्या जाण्याने अनेकांच्या चुली अनेक दिवस बंद होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे असे एकमेव नेते असावेत की, ज्यांच्यासाठी लाखो लोक अनेक दिवस साहेब परत येण्याची वाट बघत होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे असे एकमेव नेते असावेत की, ज्यांनी भटके – विमुक्त यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले, नुसतेच उभारले असे नाही तर त्यासाठी कार्यप्रणाली देखील तयार केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असे एकमेव नेते असावेत की, ज्यांनी अशक्यातून प्रवास करत पक्षासाठी अनेक गोष्टी शक्य करून दाखविल्या. विशेष म्हणजे एवढं सर्व करूनही आयुष्याच्या वळणावर त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेकवेळा संघर्ष करावा लागला. हा संघर्ष इतका टोकाचा होता की, दुसरा एखादा नेता असता तर कदाचित त्या नेत्यांनी मैदान सोडले असते. पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे लोकनेते होते त्यामुळे ते अशा संघर्षला कधीच घाबरले नाहीत. म्हणूनच ते आजही लाखो लोकांच्या हृदयाच्या कप्प्यात कायम आहेत. कदाचित आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असते तर माझ्यावर हा अन्याय झालाच नसता अशी खंत महाराष्ट्र्राचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली, यातच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मोठेपण लाभलेल्या कर्तृत्वाची ओळख होते.

ते ज्यावेळी परत परळीला येत होते, तेंव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांच्यावर काळाने झडप घातली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची वाढणारी लोकप्रियता, मिळणारे मोठेपण आणि ओबीसींच्या मुद्द्यावर राष्ट्रीय नेतृत्व ही बनत जाणारी प्रतिमा पाहून हा काळ बरेच दिवस त्यांच्यावर टपूनच बसला होता की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा काळ एवढा दुष्ट निघाला की त्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा सत्कारदेखील पाहवला नाही किंवा कदाचित हा काळच मुळात हलक्या मनाचा असावा की त्याला गडासारखे मन लाभलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच श्रेष्ठत्व मान्य झाले नाही किंवा या काळाची विचारसरणीच बुरसटलेली असावी किंवा त्यावर वर्णवर्चस्ववादाचा पगडा असावा त्यामुळेच साहेबांच सर्वमान्यत्व मान्य नसावे किंवा त्या काळाला इतिहासकाळापासून सवयच झाली असावी की, साहेबांसारखे नेतृत्वच निर्माण होऊ द्यायचे नाही.

ते काहीही झाले तरी, या अपघातातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब नावाची व्यक्ती संपेल; पण त्यांनी चाललेल्या प्रत्येक पावलातून दिलेल्या संघर्षाचा विचार कसा संपवणार? हा विचार संपू न देण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यासोबतच ज्याप्रमाणे इतर नेत्यांचे त्यांच्या – त्यांच्या भक्तांनी दैवतीकरण केले. तसे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे दैवतीकरण होणार नाही आणि त्यांना एका जातीपुरते वा वर्गापूरते मर्यादित न करण्याची काळजी घेतली पाहिजे. कारण साहेबांनी कधीही जात – धर्म – पंथ वा गट पहिला नाही. मग आपण त्यांना एका वर्गापूरते मर्यादित करणे योग्य होणार नाही. आपण प्रत्येकाने ही काळजी घेतली तरच सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल.

पुन्हा एकदा भटके – विमुक्त – ओबीसी – सर्वसामान्य – दीन –  दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र एक करून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना त्यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!

You cannot copy content of this page