उम्र का बढना तो दस्तूर-ए-जहॉं है!
महसूल ना करो तो बढती कहॉं है!
तुमची आजची दुनियादारी, तुमची कामे, त्यासाठीची धावपळ- पळापळ पाहिली की वाटते वरील ओळी तुमच्यासाठीच लिहिल्या आहेत.
खूप छान!
शेवटपर्यंत असेच आनंदात जगत रहा!
आज ७५ वी साजरी करता आहात! अशीच १०० वी साजरी करा! यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!
कामगार राज्य विमा योजनेने मला खूप गोष्टी दिल्या आहेत. त्या विभागात नोकरी करताना खूप जीवाभावाचे सहकारी दिले. यातील तुम्ही एक आहात!
कामगार राज्य विमा योजना हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय! इथे कामे करताना मतभेदही झाले. मतभेद असू शकतात; हे तत्त्व तुम्ही नेहमी स्वीकारले! ह्या मतभेदांचे तुम्ही कधीही मनभेदात रुपांतर होऊ दिले नाही! त्यामुळे तुमच्या सोबतचा प्रवास कायम मनात भरून राहिला आहे, हृदयात स्थित झाला!
ज्या गोष्टी आनंद देतात त्या करण्यात तुम्ही नेहमी अग्रेसर असता. अंधेरी येथील राजसारथी हौसिंग कॉम्प्लेक्समधील तुमचे योगदान व झपाटलेपणा आम्हीं अनुभवाला आहे. तुमच्यामुळेच ह्या कॉम्प्लेक्समध्ये अनेकांना घरे मिळाली, आसरा मिळाला! हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. काही कटु अनुभवही आले. याचे शल्य तुम्हाला नसेल; पण तुमच्या निष्ठेवर विश्वास असलेल्या माझ्या सारख्या अनेकांना याची खंत नक्कीच आहे!
जीवन प्रवास हा कधीही सोपा नसतो व आयुष्यात कधी ना कधी, काही ना काही हातातून निसटतं; हे मात्र खरं! त्याला तुम्हीही अपवाद नाही. तुम्ही जे गमावलं आहे, त्याची भरपाई होऊ शकत नाही. तुमचं दु:ख मोठं आहे! प्रत्येकाला यातून जावे लागते. जीवन हे असंच असतं. सुखाबरोबरच दु:खालाही झेलायचं असतं. हे सत्य स्वीकारून तुम्ही जगत आलात!
ह्या ७५ वर्षांनी तुम्हाला खूप काही दिलं आहे. सदगुणी व खूप प्रेमळ मुलं, गोड-गोड नातवंडं! त्यांच्या गोड आठवणी व आनंदाचे अनेक क्षण तुम्हाला लाभलेत! पुढील आयुष्यात तुम्हाला असेच आनंदाचे अनेक क्षण लाभोत! तुमच्या सुखाची ओंजळ सतत भरत राहो आणि तुमची १०० वी पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभो! त्यासाठी तुम्हांस निरोगी व आनंदी आयुष्य लाभो ही मनापासून सदिच्छा!
खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढील सुंदर आयुष्यासाठी!
आपला परम मित्र – मायकल परेरा आणि समस्त इ.एस.आय.एस परिवार
दिनांक ६ नोव्हेंबर, २०२३


Leave a Reply