सुवर्णकारांचे प्रशिक्षण घेऊन युवकांनी स्वतःचा व कोकणाचा विकास साधावा – केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू

सिंधुदुर्ग:- कोकणातील युवक हा सर्जनशिल व मुळातच कारागीर आहे. अशा या कारागिरांनी सुवर्णकारांचे प्रशिक्षण घेऊन जगाशी आपला व्यापार साधावा व त्यातून स्वतःसह कोकणाचा विकास करावा, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सावंतवाडी येतील मँगो हॉटेल येथे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील ऑफ इंडिया मार्फत सुवर्णकार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, जीजेईपीसीचे अध्यक्ष प्रमोग आग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद चंदणकर, किरीट वांच्छाली आदी उपस्थित होते.

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सीलच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची निर्यात होते असे सांगून वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारागिरांना जागतिक व्यापाराशी जोडण्याचा एक नवा मार्ग मिळणार आहे. जागतिक बाजारपेठेतील उलाढालींमुळे भविष्यात युवकांना चांगला फायदा मिळणार आहे. जागतिक बॅनरचा फायदा स्थानिक कारागिरांना मिळणार आहे. ग्रामीण सुवर्ण कारागिरी ही एक कला आहे. हा कारागीर आपले दागिने हाताने बनवतो. अशा हाताने बनवलेल्या दागिन्यांना आणि डिझायनर ज्वेलरीला मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणातून ही संधी सिंधुदुर्गातील युवकांसाठी निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घ्यावा. तसेच यामध्ये इमिटेशन ज्वेलरीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ज्वेलरीसाठी गोव्यासारखी बाजारपेठ कारागिरांसाठी जवळच उपलब्ध आहे. त्यामुळे युवकांना रोजगारासोबतच समृद्धीची संधी मिळणार आहे. तरुणांनी सुवर्णकाराचे प्रशिक्षण घेऊन कारागिरीचे शिक्षण घेऊन चांगले जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page