अखिल क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संपन्न
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर अत्यावश्यक ठरतो!
-भारताचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. शरद गावकर
मुंबई (प्रतिनिधी)- “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर अत्यावश्यक ठरतो. संपूर्ण जगात आपण संकेतस्थळाच्या माध्यमातून सहजपणे पोहचू आणि त्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणून सकारात्मक वाटचाल करू शकतो!” असे प्रतिपादन भारताचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ श्री शरद गावकर यांनी केले. अखिल क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अखिल क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटन समारंभ नुकताच डॉ. शिरोडकर समाज मंदिर, परळ, मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी संकेतस्थळाचे उद्घाटक म्हणून भारताचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. शरद गावकर बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साण्डू फार्मासिटिकल कंपनीचे महाव्यवस्थापक डॉ. प्रमोद लोकेगावकर, प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.जे.टी.आय.चे ( वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजीकल इन्स्टिट्युट) सहाय्यक प्रमुख डॉ. संदीप लोकेगावकर आणि निवृत्त प्राचार्य सुषमा शेट्ये, क्षा. म. समाजाचे विश्वस्त अध्यक्ष आर. डी. फाटक आणि उपाध्यक्ष प्रकाश वाळके उपस्थित होते.
“समाजबांधवांच्या सामाजिक संस्था, सामाजिक उपक्रम, संस्कृती, इतिहास आणि समाजामधील आदर्श व्यक्तीमत्व जगासमोर आणून पुढील पिढीला त्यांचा आदर्श जपण्यासाठी तसेच समाजाचे संघटन विधायक दृष्टीने होण्यासाठी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन अर्थात kmsamaj.org हे संकेतस्थळ पुढाकार घेईल; त्यासाठी संकेतस्थळाचे मुख्य संपादक नरेंद्र हडकर आणि मुख्य संचालक सुरेश डामरे यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे!” असे उद्गार श्री. शरद गावकर यांनी काढले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शास्त्रज्ञ शरद गावकर यांच्या हस्ते क्षात्रकुलोत्पन्न समाजाचे संस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर दिपप्रज्वलन करून समाजाचे संस्थापक डॉ. रामचंद्र शिरोडकर, शिक्षणतज्ञ एच. डी. गावकर, शिक्षणमहर्षी डॉ. शिवाजी गावडे, शिक्षणप्रसारक भाऊसाहेब लोकेगावकर, सहकारमहर्षी सहदेव फाटक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.
पत्रकार नरेंद्र हडकर आणि ग्राफिक्स डिझायनर जितेंद्र लोके यांनी तयार केलेली तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि सामाजिक कार्य इत्यादी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच शास्त्रज्ञ शरद गावकर आणि मुख्य संचालक सुरेश डामरे यांनी संकेतस्थळाचे उद्घाटन केले. मान्यवरांचा सत्कार करून सन्मानचिन्हे देण्यात आली; तर शरद गावकर यांना त्यांचे चित्र चित्रांकित करून सुरेश डामरे आणि चित्रकार धनंजय कोकाटे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले.
यावेळी साण्डू फार्मासिटिकल कंपनीचे महाव्यवस्थापक डॉ. प्रमोद लोकेगावकर यांनी वेबसाईटचे महत्व सांगून सर्व समाज बांधवांनी संकेतस्थळाला सहकार्य करण्याचे आणि भविष्यात अॅप तयार करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये संपर्क साधला राखल्यास आपल्या सर्वांचे हित आहे;असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्य्क पोलीस आयुक्त श्री. प्रभाकर लोके सर्वोच्च न्यायालयात महत्वाच्या खटल्याचे कामकाज असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु त्यांनी संकेतस्थळाला शुभेच्छा देणारी चित्रफीत पाठविली आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून समाजाचे संघटन यशस्वी होईल; असा आशावाद व्यक्त केला.
त्याचप्रमाणे व्ही.जे.टी.आय.चे सहाय्यक प्रमुख डॉ. संदीप लोकेगावकर आणि निवृत्त प्राचार्या सुषमा शेटये, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, परळ, मुंबईचे विश्वस्त अध्यक्ष आर. डी. फाटक आणि उपाध्यक्ष प्रकाश वाळके, सनदी लेखापाल राम गावडे, समाज नेते संजय गिरकर, विजय मुंबरकर अशा अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी संकेतस्थळाला शुभेच्छा देताना “क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटनचे सिंधुदुर्गात कार्य करण्याची जबाबदारी आपण स्वीकारू आणि विधायक कार्याला सहकार्य करू!” असे सांगितले. पत्रकार भगवान लोके यांचा सत्कार संकेतस्थळाचे मुख्य संचालक सुरेश डामरे यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संकेतस्थळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेबसाईटचे आणि पा. `स्टार वृत्त’चे संपादक नरेंद्र हडकर तर आभार प्रदर्शन राकेश कांबळे आणि सुनील जेठे यांनी केले.
(छायाचित्र:- उजवीकडून नरेंद्र हडकर, संजय गिरकर, डॉ. संदिप लोकेगावकर, प्रकाश वाळके, आर. डी. फाटक, शरद गावकर, डॉ. प्रमोद लोकेगावकर, सुषमा शेटये, सुरेश डामरे, संदिप शिर्के)