‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’साठी महिला उद्योजकांना आवाहन!

निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार नवी दिल्ली:- स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन…

निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार

नवी दिल्ली:- स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’ साठी आवेदन मागविण्यात आले आहेत. आवेदनाची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.

निती आयोगाच्यावतीने दरवर्षी ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग अवार्ड’ देण्यात येतो. ‘महिला आणि उद्योजकता’ असा यावर्षीच्या पुरस्काराचा विषय असून पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकतेच निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील निवासी समन्वयक युरी अफानसासीइव यांनी या पुरस्कारासाठी देशभरातील महिला उद्योजकांना आवेदन करण्याचे आवाहन केले आहे.

महिलांमधील शक्ती ओळखून त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी व लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देशातील कर्तृत्ववान महिला उद्योजकांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग अवार्ड’ प्रदान करण्यात येतो. विविध अडचणींचा सामना करत परंपरागत चाकोरी मोडीत काढणाऱ्या देशातील महिला उद्योजकांकडून या पुरस्कारासाठी आवेदन मागविण्यात आले आहेत. तसेच, या उद्योजकांकडून महत्त्वाच्या विकास कामांपुढील आव्हानांबाबत उपाययोजना सुचविण्याचे आवाहनही यासोबत करण्यात आले आहे.

आवेदक स्वत: आपला अर्ज https://wep.gov.in या संकेतस्थळावर करू शकतात. तसेच +91-7042648877 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून आवेदकांना आवश्यक माहिती व मदत करण्यात येणार आहे. ३० जून २०१८ ही आवेदनाची अंतिम तारीख आहे. (‘महान्यूज’)

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page